शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट, ठाणे तर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कायदेविषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये कायद्याची जाण होण्यासाठी लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. यावेळी महिलांविषयक कायदे, पोलीस कायदे, सायबर कायदे, मानवी हक्क संरक्षण कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, जमीन विषयक कायदे अशा विविध कायद्यांबद्दल सन्माननीय अतिथी वकील श्री. आकाश रामधन थाटे, माजी प्रशिक्षक, विशेष पोलीस अधिकारी, महाराष्ट्र शासन तथा माजी अध्यापक, एस.एन.डी.टी. विद्यापीठ यांनी आपला अमुल्य वेळ देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित लोकांनी आपल्या कायदेविषयक अडचणींबाबत विविध प्रश्न विचारले व त्यावर वकील आकाश रामधन थाटे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच सध्याच्या युगात इंटेरनेट, व्हाट्सएप, मोबाईल याद्वारे लोकांची होत असलेली फसवणूक कशी थांबवावी याबद्दल देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री. शशिकांत रणवरे यांनी स्वीकारले. या कार्यक्रमामध्ये वकील श्री. सुरेश चंद्रकांत साटम, वकील सौ. अर्चना महाडीक, वकील सौ. रेखा जगताप, ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार देशमुख व ट्रस्टचे इतर विश्वस्त तसेच सभासद हे उपस्थित होते. ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार देशमुख यांनी ट्रस्टमार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची स्तुती करून भाविष्यात देखील ट्रस्ट मार्फत असे समाज उपयोगी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवावेत असे मत व्यक्त केले. यावेळी ट्रस्टच्या विश्वस्तांनी उपस्थितांचे आभार मानले. || जय शिवराय ||