शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट, इतिहासाचे अबोल साक्षीदार बहुउद्देशीय ट्रस्ट आणि जिल्हा परिषद शाळा, कोळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ता. कराड, जि. सातारा येथे शैक्षणिक व ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेमधील विद्यार्थ्यांनी उद्घाटन प्रसंगी लेझिम आणि ढोल-ताशाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमामध्ये सरस्वती वंदना, स्वागतगीत आणि वक्तृत्व सादर केले तसेच छत्रपती शिवरायांची आरती देखील करण्यात आली. या उपक्रमामध्ये ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक वस्तूंची मदत पुरविण्यात आली, तसेच स्थानिक गरजू ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कऱण्यात आले. तसेच या शैक्षणिक व ऐतिहासिक उपक्रमात शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा आणि ऐतिहासिक पुस्तके ट्रस्ट तर्फे बक्षिस म्हणून देण्यात आली. शस्त्र विशारद श्री. निलेश अरुण सकट यांनी इतिहासाचे अबोल साक्षीदार बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी शिवकालीन ऐतिहासिक शास्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवून शालेय विद्यार्थ्यांना तसेच सर्व ग्रामस्थांना दुर्मिळ अशा शिवकालीन शस्त्रास्त्रांची माहिती दिली. इतिहास अभ्यासक श्री. विजय लोहार सर यांनी ऐतिहासिक गडकिल्ले संवर्धन विषयक चित्रफित सादर करून विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांची माहिती व गडकिल्ले संवर्धनाचे महत्व पटवून दिले. मर्दानी खेळ प्रशिक्षक शिवभक्त श्री. विजय कराळे, कराड आणि त्यांच्या चमूने मर्दानी खेळ यामध्ये लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा चालविणे याची प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमामध्ये पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ट्रस्टच्या या ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शन व शैक्षणिक मदत कार्य उपक्रमामध्ये विशेष उपस्थिती म्हणून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज श्री. जयाजीराजे बाजी मोहिते, बहिर्जी नाईक यांचे वंशज श्री. दादाराव नाईक, शिवसंत श्री. कृष्णाजी पाटील गुरुजी, छत्रपती श्री शिवाजीमहाराज समाधी किल्ले रायगडचे पुजारी, इतिहास अभ्यासक श्री. विजय लोहार सर, श्री. विनायक काशीनाथ चौगुले, अभिनेता व कला दिग्दर्शक, शस्त्र विशारद श्री. निलेश अरुण सकट, मुख्य विश्वस्त इतिहासाचे अबोल साक्षीदार बहुउद्देशीय ट्रस्ट, श्री. मयुर रणवरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. सन्मती देशमाने, गटशिक्षण अधिकारी, पं. स. कराड, श्रीमती मीना साळुंखे, गटविकास अधिकारी, पं. स. कराड, श्री. रमेशजी देशमुख माजी उपसभापती, पं. स. कराड, सौ. रत्नमाला पाटील, सरपंच कोळेवाडी, श्री. सदाशिव आमणे, केंद्र प्रमुख, कोळे, श्रीमती जमीला मुलानी, शिक्षण विस्तार अधिकारी, पं. स. कराड हे उपस्थित होते. मान्यवरांना शाळा तसेच ट्रस्टकडून छत्रपती श्री शिवरायांची तेजोमय प्रतिमा व शाल-श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. हा अविस्मरणीय असा कार्यक्रम कराड येथे प्रथमच आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळेवाडी येथील शिक्षक श्री. प्रमोद गायकवाड सर, इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग आणि अधिकारी, तसेच शिवसंस्कृती ट्रस्ट आणि इतिहासाचे अबोल साक्षीदार ट्रस्ट चे पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. || जय शिवराय ||