तपशील

मोतीलाल हरगोविंददास विद्यालय, जिल्हा ठाणे येथील शैक्षणिक मदत - नोव्हेंबर २०२२

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत मोतीलाल हरगोविंददास विद्यालय, जिल्हा ठाणे येथील विद्यार्थ्यांना भौतिक साहित्य पेटी व इतर शैक्षणिक वस्तू पुरविण्यात आल्या. तसेच शाळेसाठी छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा अर्पण करण्यात आली. शाळेच्या उप मुख्याध्यापिका सौ. कुलकर्णी मॅडम तसेच इतर शिक्षक व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत ही मदत शाळेला पुरविण्यात आली. यावेळी शिवसंस्कृती ट्रस्टचे विश्वस्त श्री. शशिकांत रणवरे, श्री. अमर रणवरे, श्री. विनय गावडे हे उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षकांसोबत मराठी शाळेमधील मुलांची कमी होत चाललेली संख्या व मराठी शाळेचा प्रचार व प्रसार याबाबत चर्चा करण्यात आली. या भेटीमध्ये असे लक्षात आले की मराठी शाळांचे संस्थाचालक व शिक्षक यांच्यापुढे विद्यार्थ्यांच्या कमी होत चाललेल्या संख्येमुळे शाळा चालवणं हेच मोठे आव्हान होऊन बसले आहे. या सगळ्यामध्ये शाळांचा आर्थिक डोलारा सांभाळणे ही सहज साध्य गोष्ट नाही. या आव्हानासमोर माना झुकवून बर्‍याच मराठी शाळा बंद पडल्या किंवा इंग्रजी झाल्या. तरी आज देखील बर्‍याच मराठी शाळा या आव्हानाला धाडसाने सामोर्‍या जात आहेत आणि शाळेचा आर्थिक गाडा हाकत आहेत. तरी समाजातील एक जबाबदार घटक म्हणून आपल्याला मराठी शाळांच्या संस्थाचालक व शिक्षक वर्गासोबत उभं राहणं गरजेचं आहे. तरी यापुढे देखील मराठी शाळा वाचविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत राबविण्याचा संकल्प असून आपण सुद्धा मराठी शाळा टिकून राहण्यासाठी या उपक्रमामध्ये ट्रस्टला सर्वतोपरी सहकार्य करावे, ही नम्र विनंती. || जय शिवराय ||