शिवसंस्कृती ट्रस्टचा नववर्षातील प्रथम उपक्रम...!! शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत जिल्हा परिषद शाळा कातकरी वाडी, वाचकोले, ता. शहापुर, जिल्हा ठाणे येथील अतिदुर्गम ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थांना संगणकाचा संपूर्ण संच, शैक्षणिक साहित्य वाटप आणि नागरी सुविधेपासून वंचित असलेल्या तथा निराधार स्त्रिया आणि ग्रामस्थांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलांसोबत छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली. त्यानंतर शाळेला संगणकाचा संपूर्ण संच मदत म्हणून देण्यात आला आणि सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच शिरवंजे ग्रामपंचायत येथील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू, कपडे, महिलांसाठी सॅनिटरी पॅड आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये गावातील अपंग व निराधार असलेल्या तसेच अपघातामध्ये एक हात गमावलेले वडील आणि वयोवृद्ध आजोबा यामुळे कुटुंबामध्ये कमावणारे कोणीही नसलेल्या ताईला जीवनावश्यक वस्तुंची मदत देण्यात आली. तसेच शहापुर येथील विविध विभागांतील विटभट्टीवर मोलमजुरीचे काम करणाऱ्या महिलांना सैनिटरी पॅड, लहान मुलांना खाऊ आणि इतर वस्तुंची मदत देण्यात आली. त्यासोबतच बाभळे ग्रामपंचायत, शहापुर येथील पतीने उघड्यावर टाकलेली महिला, जिची मजूरीचे काम करणारी आई तसेच अर्धांगवायूचा झटका आल्याने काम करण्यास असमर्थ असलेले आणि यामुळे हतबल झालेले वडील यांच्या आश्रयास असलेली सदर महिला व तिची दोन मुले यांना काही महिन्यांचा शिधा व इतर वस्तुंची मदत देण्यात आली. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कातकरी वाडी, वाचकोले जि. प. शाळेच्या प्रमुख शिक्षिका सौ. ज्योत्सना दवणे मॅडम, सौ. गीता मोरे मॅडम आणि शिरवंजे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. चंद्रकांत पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाच्या पूर्वतयारीपासून ते प्रत्यक्षात उपक्रम राबविणे पर्यंत शहापूर येथील समाजसेवक व शिवभक्त श्री. नंदू आवार यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यावेळी शिवसंस्कृती ट्रस्टचे विश्वस्त श्री. अमर रणवरे, श्री. विनय गावडे व श्री. महेश कल्याणी उपस्थित होते. सदर वेळी शिवसंस्कृती ट्रस्टच्या विश्वस्तांमार्फत शहापुर येथील कुपोषित मुलांच्या पालकांची भेट घेण्यात आली, तसेच गरोदर मातांची माहिती श्री. नंदू आवार यांचेकडून घेण्यात आली. कुपोषित मुलांची शारिरीक परिस्थिती व गरोदर माता यांना द्यावा लागणारा आहार, पौष्टिक खाद्यपदार्थ याबद्दल माहिती घेऊन त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या आणि कुपोषित मुले व गरोदर माता यांच्यासाठी भविष्यात विशेष उपक्रम राबविण्याचा मानस ट्रस्टच्या विश्वस्तांमार्फत व्यक्त करण्यात आला.