तपशील

श्री क्षेत्र किल्ले वारुगड, ता. माण, जि. सातारा येथे छत्रपती श्री शिवाजीमहाराज आणि धर्मवीर श्री संभाजीमहाराज यांच्या तेजोमय मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आणि लोकार्पण व शिरवली, ता. माण, जि. सातारा येथील शैक्षणिक मदत उपक्रम - जुन २०२३

श्री क्षेत्र किल्ले वारुगड, ता. माण, जि. सातारा येथे शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट, राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट आणि छत्रपती श्री शिवराय अभियान, केखले, कोल्हापुर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती श्री शिवाजीमहाराज आणि धर्मवीर श्री संभाजीमहाराज यांच्या तेजोमय मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आणि लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला. या उपक्रमासाठी श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान कमिटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी छत्रपती श्री शिवरायांच्या रायगड येथील समाधीचे पुजारी शिवसंत श्री. कृष्णाजी पाटील गुरुजी यांच्या हस्ते शिवराय आणि शंभुराजांच्या मूर्तिंना महाराष्ट्रातील १४ गडकोटांवरील जलाने अभिषेक घालण्यात आला आणि मूर्तिंची विधीवत प्रतिष्ठापणा करण्यात आली. तसेच येथील मंदिरांसाठी शिवरायांची तेजोमय प्रतिमा अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसंत श्री. कृष्णाजी पाटील गुरुजी यांनी उपस्थित शिवभक्तांना या गडाचा इतिहास, महत्व तसेच येथील बांधकामाबद्दल महत्त्वाची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर शिरवली, ता. माण, जि. सातारा येथील प्राथमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेतील मुलांना शाळेचे दप्तर, वह्या व इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. या शैक्षणिक उपक्रमासाठी ठाणे येथील वकिल श्री. सुधीर जगदाळे आणि जय हनुमान सामाजिक संस्था, शिरवली यांचे खुप मोठे सहकार्य लाभले. यावेळी मुलांना संस्थेमार्फत अल्पोपहार देण्यात आला आणि या शिवकालीन पावन अशा भूमीचे महत्त्व, इतिहास आणि भविष्यातील वाटचालीबद्दल श्री. कृष्णाजी पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी शिरवली येथील सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.