शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत ज्ञानाई माध्यमिक विद्यालय, धामणी, ता. पनवेल जि. रायगड येथील डोंगर पट्टयामधून, जेथून शाळेमध्ये येण्यासाठी व्यवस्थित रस्ताही नाही अश्या ठिकाणाहून ऊन, वारा, पाऊस यांना तोंड देत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या आदिवासी विभागातील गरीब व गरजू विद्यार्थांना संगणकाचा संपूर्ण संच, लॉंग बुक व इतर शैक्षणिक साहित्य वाटप आणि नागरी सुविधेपासून वंचित असलेल्या ग्रामस्थांना कपडे व इतर मदत पुरविण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ (ट्रस्ट) चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवसंत श्री. विजयदादा खिलारे, शिवसंत सौ. नुतनआई खिलारे , शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना (महाराष्ट्र राज्य) चिटणीस मा. श्री. बापू ढेंबरे आणि नवी मुंबई महानगर पालिकेचे वरिष्ठ लिपीक श्री. सचिन सोनावणे यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली, मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि शाळेसाठी तसेच मान्यवरांना शिवरायांची तेजोमय प्रतिमा अर्पण करण्यात आली. त्यानंतर शाळेला संगणकाचा संपूर्ण संच मदत म्हणून देण्यात आला आणि सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी श्री. सचिन सोनावणे यांनी मुलांसाठी वह्या उपलब्ध करून दिल्या, तसेच ठाणे येथील सुप्रसिद्ध सिटी समोसा चे संस्थापक श्री. चंद्रशेखर वाघदरे यांनी या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य अल्पोपहार उपलब्ध करून दिला. श्री. प्रदीप गेले यांनी संगणक, शैक्षणिक व इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध करून दिली. यावेळी शिवरत्न श्री. योगेश खिलारे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिवरायांचे विचार आपल्या दैनंदिन जिवनात कसे अंगिकारावे, तसेच दैनंदिन जिवनातील या खडतर प्रवसामध्ये आपला विकास कसा साधावा, शिवचरित्राच्या माध्यमातून आपले भविष्य कसे उज्वल करावे, आपल्या पुढील वाटचालीमध्ये कोणत्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे याबद्दल विशेष असे मार्गदर्शन केले. ही शैक्षणिक मदत उपलब्ध करण्यासाठी ट्रस्टला सहकार्य केलेले सर्व देणगीदार व हितचिंतक यांचे शाळा प्रशासनाकडून आभार मानण्यात आले.