शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशिय ट्रस्ट मार्फत ७७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दुधेश्वर माध्यमिक विद्यालय, दुधेबावी, ता.फलटण, जि.सातारा येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी एकेरी वह्या, लाँग बुक, पेन व इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. या प्रसंगी श्री. बापू ढेंबरे, शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना (महाराष्ट्र राज्य) चिटणीस यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ व ट्रस्टचे सदस्य उपस्थितीत होते. या उपक्रमाअंतर्गत छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली आणि छत्रपती श्री शिवरायांच्या इतिहासाबद्दल माहिती देऊन शिवचरित्राच्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक तसेच पुढील जीवनामध्ये कशी प्रगती साधण्यात यावी याबद्दल मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व ट्रस्टचे सदस्य श्री.लालासो रणवरे आणि श्री.जितेंद्र ढमाळ यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व बिस्कीटे देण्यात आली. तसेच शाळांसाठी छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा अर्पण करण्यात आली. या शाळेमधील गरीब व गरजु विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यासाठी ट्रस्टला केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल शाळा प्रशासनाकडून शिवसंस्कृती ट्रस्टच्या सर्व देणगीदारांचे व हितचिंतकांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमासाठी शिक्षिका सौ.प्रीतम शिंदे, मुख्याध्यापक व इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमांमध्ये ट्रस्टचे सदस्य सौ. निलम गायकवाड, श्री. ओंकार रणवरे, श्री. संग्राम भोसले, श्री. सुयोग गरुड यांनी सहभाग घेतला.