तपशील

ट्रस्ट मार्फत दिपावली निमित्त मतिमंद मुलांची निवासी शाळा, ता. कर्जत, जि. रायगड येथील विशेष (मतिमंद) मुलांसाठी नवीन कपडे, खाऊ व जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात आली.

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत दिपावली निमित्त मतिमंद मुलांची निवासी शाळा, ता. कर्जत, जि. रायगड येथील विशेष (मतिमंद) मुलांसाठी नवीन कपडे, खाऊ व जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व मान्यवरांचे श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवसंस्कृती ट्रस्टचे सन्माननीय हितचिंतक श्री. सुयोग ढेंबरे यांचा जन्मदिन या विशेष मुलांसोबत साजरा करण्यात आला व या मुलांना नवीन कपडे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच या विशेष मुलांच्या निवासी शाळेसाठी तांदूळ, गहू, साखर, विविध प्रकारच्या डाळी, तेल, अंघोळीचे साबण, कपड्यांचे साबण, सुके खोबरे व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात आली. सदरप्रसंगी या विशेष मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत अहोरात्र काम करणाऱ्या व या मुलांसाठी स्व:इच्छेने बहुमोल योगदान देणाऱ्या तेथील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना छत्रपती श्री शिवरायांच्या मूर्ती भेट देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला व शाळेसाठी छत्रपती श्री शिवरायांची तेजोमय प्रतिमा अर्पण करण्यात आली. या उपक्रमासाठी श्री. बापू ढेंबरे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना (महाराष्ट्र राज्य) चिटणीस, श्री. संतोष भाबड, श्री. सुयोग ढेंबरे, श्री. पियुष ढेंबरे व इतर मित्रपरिवार उपस्थित होते. मतिमंद मुलांच्या निवासी शाळेचे संस्थापक श्री. दिलीप जेठे व इतर कर्मचारी यांनी शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत दिपावली निमित्त या विशेष मुलांना नवीन कपडे, खाऊ व शाळेसाठी केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीबद्दल ट्रस्टच्या सर्व देणगीदार व हितचिंतकांचे आभार मानले व ट्रस्टच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या उपक्रमावेळी ट्रस्टच्या विश्वस्तांमार्फत या विशेष मुलांना सांभाळताना त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या आणि तेथील मुलांसाठी भविष्यात शक्य तितकी मदत करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.