तपशील

जुलै २०२४ - सरदार श्रीमंत जिवाजी सुभानजी रणनवरे/रणवरे यांच्या समाधीच्या पावन स्थळी एन.ई.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, निमसाखर, ता. इंदापुर, जि. पुणे येथील गरजु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, वह्या, अंकलिपी, कंपास, कलर खडू, पेन, पेन्सिल, शार्पनर, खोडरबर इ. शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले.

शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सरदार श्रीमंत जिवाजी सुभानजी रणनवरे/रणवरे यांच्या समाधीच्या पावन स्थळी निमसाखर, ता. इंदापुर, जि. पुणे येथील जिल्हा परिषद शाळा व एन.ई.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, निमसाखर येथील गरजु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, वह्या, अंकलिपी, कंपास, कलर खडू, पेन, पेन्सिल, शार्पनर, खोडरबर इ. शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. उपक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेमध्ये छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि शाळेसाठी शिवरायांची तेजोमय प्रतिमा अर्पण करण्यात आली. त्यांनतर विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर एन.ई.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेचे दिवंगत उपाध्यक्ष व समाजसेवक कै. संजय सूर्यकांत रणवरे (पप्पू पाटील) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या स्मरणार्थ गावातील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट, हडपसरचे संस्थापक आणि आध्यात्मिक वारकरी गुरुकुल, पुणेचे समन्वयक श्री. प्रमोद दादा जयसिंगराव रणनवरे हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव श्री. धनंजय रणवरे, मुख्यध्यापक श्री. चंद्रकांत रणवरे, सर्व शिक्षक वर्ग व ग्रामस्थ हजर होते. मान्यवरांचे शाल व श्रीफळ तसेच छत्रपती श्री शिवरायांची तेजोमय प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. या उपक्रमामध्ये आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून निमसाखर गावाला लाभलेला एक मोठा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी सहभागी होण्याचे ट्रस्ट मार्फत उपस्थित शिवभक्तांना आवाहन करण्यात आले. तसेच या दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना छत्रपती श्री शिवराय, छत्रपती श्री शंभुराजे व स्वराज्यासाठी लढलेल्या सर्व मावळ्यांच्या इतिहासाबद्दल प्रत्यक्ष समाधीस्थळी घेऊन जाऊन मुलांमध्ये इतिहासाप्रती आवड निर्माण होण्यासाठी विविध ऐतिहासिक उपक्रम राबविण्याचे शाळा प्रशासनाला आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ही शैक्षणिक मदत उपलब्ध करण्यासाठी ट्रस्टला सहकार्य केलेले सर्व देणगीदार व हितचिंतक यांचे संचालक मंडळ व शाळा प्रशासनाकडून आभार मानण्यात आले. त्यानंतर उपस्थित असलेले प्रतिष्ठीत मान्यवर व ग्रामस्थ यांच्यासोबत सरदार श्रीमंत जिवाजी सुभानजी रणनवरे/रणवरे यांच्या समाधी स्थळाची साफसफाई व पुजन करण्यात आले. तसेच समाधीस्थळाची पाहणी करून समाधी व सभोवतालच्या परिसराची देखभाल निरंतरपणे चालू राहण्याबाबत व हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आवश्यक पुढील वाटचाली संदर्भात ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आली.