शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट, क्षत्रिय धारपवार चॅरीटेबल संस्था आणि महाराष्ट्र शैक्षणिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दसऱ्यानिमित्त ठा.म.पा शाळा क्र. ७, टेंभीनाका, ठाणे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडले. या कार्यक्रमाचे उदघाटन ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संजय पितळे, ऑस्कर हॉस्पिटलचे डायरेक्टर श्री. अजय काटे, सामाजिक न्याय व महिला अधिकार बोर्डचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि एम.एस.एम.ईचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. किशोरजी खत्री, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुधाकर बक्षी, पोलिस कर्मचारी कविता पतंगे मॅडम, अक्षय ब्लड बँकेच्या प्रतिनिधी सौ. अनिता जाधव यांच्या हस्ते करून छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार देशमुख, ज्येष्ठ केंद्रीय कर्मचारी श्री. अनंत विचारे, दैनिक महाराष्ट्र सम्राटचे संपादक श्री. गणेश भोईटे, साप्ता. ठाणे नवादूतचे संपादक श्री. दिनेश जोशी, ठाणे येथील ज्येष्ठ वकील श्री. सुरेश साटम, जिल्हा सैनिक बोर्डाचे माजी सैनिक श्री. जयदीप भोईर व इतर मान्यवर हजर होते. उपस्थितांचा पुष्पगुच्छ व छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या रक्तदान शिबीरासाठी अक्षय ब्लड बँक, पुणे यांचेमार्फत रक्त संकलन करण्यात आले. तसेच ऑस्कर हॉस्पिटल, ठाणे यांच्यामार्फत विनामुल्य वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला. या उपक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांनी दिलेल्या अनमोल योगदानाबद्दल ट्रस्ट मार्फत छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या रक्तदान शिबीरामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संजय पितळे यांनी शिबीराचे आयोजन केलेबाबत सर्व संस्थांचे आभार व्यक्त केले आणि आज रूग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी अशा रक्तदान शिबिरांमध्ये सहभागी होऊन या समाजकार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जनतेला केले. तसेच गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रक्तदानासारख्या बहुमोल अशा शिवकार्यामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी जमेल तेव्हा सहभाग घ्यावा आणि आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन ट्रस्टमार्फत करण्यात आले.