शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्टमार्फत दिपावली निमित्त पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील नवोदय संचालित निवासी मतिमंद मुलांचे विद्यालय आणि अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह या दोन्ही शाळेतील मुलांना जीवनावश्यक वस्तू, खेळाचे साहित्य, नवीन कपडे, कडधान्य, अन्नधान्य, घरगुती वापराची भांडी, खाऊ इत्यादी वस्तूंची मदत पुरवण्यात आली व या मुलांसाठी अन्नदान करण्यात आले. उपक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती श्री शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक तसेच मुख्याध्यापक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून येथील मुलांचे संगोपन करताना संस्थेला ज्या विविध अडचणींचा सामना करावा लागतो त्याबाबत माहिती दिली. या शाळेमध्ये भारतभरातून आलेली अशी मतिमंद विशेष मुले आहेत की त्यांच्या पालकांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधांची वानवा असून गरजेवेळी ॲमब्युलन्स देखील वेळेवर उपलब्ध होत नाही, मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील या मुलांना गरजेवेळी लवकरात लवकर कसे उपचार उपलब्ध होतील यासाठी संस्थेतील प्रत्येक कर्मचारी हा प्रयत्नशील असतो. सदर उपक्रमाच्या अनुषंगाने ट्रस्टच्या सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे एक दिवसासाठी या मुलांचे पालकत्व स्विकारण्यात आले होते त्यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झालेला होता. तसेच मुलांना नवीन कपडे, खाऊ आणि खेळणी यांचे वाटप केल्यानंतर ही मुले अत्यंत भारावून गेली होती. या उपक्रसाठी निवासी मतिमंद विद्यालयाचे व्यवस्थापक श्री. प्रताप निर्हाळी, मुख्याध्यापक श्री. आदिनाथ शिरसाठ, कला शिक्षक श्री. आप्पासाहेब गायकवाड व अनाथ मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सचिन तरवडे, अधिक्षक श्री. संभाजी झावरे, प्र. मुख्याध्यापक श्री. नितेश मेघनर आणि दोन्ही शाळांच्या सर्व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. ट्रस्टच्या सर्व हितचिंतक व देणगीदारांच्या सहकार्यामुळे दिपावली उपक्रमानिमित्त या दोन्ही शाळांमधील मुलांसाठी महिनाभराचा शिधा, खेळाचे साहित्य आणि नवीन कपडे उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल संस्थाचालकांनी ट्रस्टच्या सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमावेळी ट्रस्टचे विश्वस्त श्री. अमर रणवरे, श्री. विनय गावडे तसेच सदस्य श्री. संतोष भाबड व श्री. महेश कल्याणी उपस्थित होते. सदर संस्था तसेच महाराष्ट्रभरातील यासारख्या अनेक अनाथ-मतिमंद मुला-मुलींच्या शाळा व वसतीगृहांना शासनाकडून मिळत असलेले अनुदान अत्यल्प असून त्यामुळे या मुलांच्या संगोपनाचा खर्च चालविण्यासाठी अशा संस्थांना जीवाचे रान करावे लागत आहे. तरी अशा सामाजिक बांधिलकी जपणारे मानवतेचे कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून मुबलक प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती शिवसंस्कृती ट्रस्टमार्फत शासनाला करण्यात येत आहे.