तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था, पुणे यांचे मार्फत मर्दानी खेळ व शिवकालीन युद्धकला राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेचे आयोजन पिंपरी-चिंचवड, पुणे येथे दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शिवसंस्कृती ट्रस्टच्या शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, फरशी कुऱ्हाड चालविणे याची प्रात्यक्षिके सादर करून सांघिक युद्धकाला सादरीकरणामध्ये पारितोषिक पटकावले. त्याचप्रमाणे शिवसह्याद्री मर्दानी आखाडा, ठाणे येथील प्रशिक्षणार्थींनी तलवारबाजी, दांडपट्टा, फरशी-कुऱ्हाड, वीट फेक अशा विविध युद्धकलांचे सादरीकरण करून पारितोषिक मिळविले. या दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई येथील ज्येष्ठ वस्ताद श्री. लक्ष्मणजी साबणे गुरुजी आणि शिवसह्याद्री मर्दानी आखाडा, ठाणे चे संस्थापक वस्ताद श्री. संदीप चव्हाण दादा यांनी विशेष मेहनत घेतली. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामधून विविध जिल्ह्यातील संस्थांनी हजेरी लावून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच विविध शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून छत्रपती श्री शिवराय, छत्रपती श्री संभाजीमहाराज आणि स्वराज्यासाठी लढलेल्या आपल्या तमाम मावळ्यांच्या आठवणी जाग्या केल्या. या स्पर्धेमध्ये लहान वयाचे विद्यार्थी तसेच मुलींनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. यावेळी राज्यातील विविध भागांमधून आलेल्या मावळ्यांनी आपल्या चित्तथरारक मर्दानी खेळ प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.