शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट मार्फत राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी श्री मच्छिंद्रनाथ देवस्थान, सावरगाव, जिल्हा बीड येथे आरोग्य शिबिर राबविण्यात आले. तसेच ट्रस्टच्या सर्व देणगीदार व हितचिंतकांच्या सहकार्याने सदर दिवशी येथे आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी अन्नदान करण्यात आले. उपक्रमाच्या सुरुवातीला श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे पूजन करून आई जिजाऊ आणि छत्रपती श्री शिवरायांच्या मूर्तींचा अभिषेक घालण्यात आला. या पूजनासाठी श्री मच्छिंद्रनाथ देवस्थानाचे पुजारी श्री. नवनाथ महाराज आणि श्री. रसाळ महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमामध्ये संस्थेचे सदस्य श्री. संदीप जोशी आणि श्री. सचिन शिंगटे, डोंबिवली यांच्यामार्फत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. या शिबिरामध्ये पाठ दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी अशा विविध व्याधींनी त्रस्त झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. या शिबिराचा राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या भक्तांनी लाभ घेतला. तसेच या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे व सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यानंतर राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्री मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे राबविण्यात आलेल्या अन्नदान उपक्रमाचा मोठ्या संख्येने आलेल्या भक्तांनी लाभ घेतला. अन्नदानासाठी श्री मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे दिवस-रात्र, निरंतरपणे भंडाऱ्याचे नियोजन करणारे श्री. रामकृष्ण बोराडे मामा, श्री. चांद शेख आणि श्री. जाधव मामा यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे शिवसंस्कृती ट्रस्टचा हा उपक्रम राबवण्यासाठी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) ट्रस्टचे विश्वस्त श्री. चंद्रकांत लोखंडे, अध्यक्ष श्री. चितळे सर, सचिव श्री. बाबासाहेब म्हस्के तसेच व्यवस्थापक श्री. आयुब शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी शिवसंस्कृती ट्रस्टला केलेल्या या सहकार्याबद्दल ट्रस्ट मार्फत शाल, श्रीफळ आणि छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा देऊन त्यांचे आभार मानण्यात आले व यावेळी श्री मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे हा प्रशंसनीय असा उपक्रम राबविल्याबद्दल श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमार्फत शिवसंस्कृती ट्रस्टचे विश्वस्त, सर्व सदस्य, देणगीदार आणि हितचिंतकांचे आभार व्यक्त करण्यात आले.