तपशील

मार्च २०२५ :- धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र शौर्यपीठ तुळापूर आणि श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील श्री शंभूमहाराजांच्या समाधींचे पूजन.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र शौर्यपीठ तुळापूर आणि श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील श्री शंभूमहाराजांच्या समाधींचे पूजन ट्रस्टमार्फत करण्यात आले. यावेळी श्री किल्ले रायगड येथील शिवरायांच्या समाधीचे पुजारी शिवसंत श्री कृष्णाजी पाटील गुरुजी, प्रख्यात शिवकीर्तनकार श्री रोहिदास हांडे महाराज, राजश्री शिवबा विचार प्रसारक ट्रस्टचे अध्यक्ष शिवसंत श्री विजय दादा खिलारे आणि तमाम ग्रामस्थ उपस्थित होते. उपक्रमाच्या सुरुवातीला तुळापूर येथील श्री शंभूमहाराजांच्या समाधीचे पूजन करण्यात आले आणि २१ विविध गडकिल्ल्यावरील जलाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर उपस्थित शिवभक्तांसोबत कवी कलश यांची समाधी तसेच श्री महादेव मंदिराचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा श्रीक्षेत्र तुळापूर येथे विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने ट्रस्टच्या हितचिंतक आणि देणगीदारांच्या सहकार्याने पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी शिवसंत श्री कृष्णाजी पाटील गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती श्री शिवराय, छत्रपती श्री संभाजीमहाराज तसेच तुळापूर येथील पवित्र समाधी स्थळ याचे महत्व पटवून दिले आणि शिवचरित्रकार ह.भ.प. रोहिदास हांडे महाराज यांनी विद्यार्थ्यांना गोष्टींच्या स्वरूपात शिक्षणाचे तसेच आपली जाज्वल्य इतिहासाचे महत्त्व कथन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शांताराम भोसले सर आणि शिक्षक वर्गाने शाळेला पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध करून दिल्याबद्दल ट्रस्ट तसेच सर्व देणगीदारांचे आभार मानले. या उपक्रमासाठी तुळापूर येथील ग्रामस्थ श्री सुनील राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामध्ये ट्रस्टमार्फत अन्नदानासाठी सहकार्य करण्यात आले. तुळापूर येथील उपक्रमा नंतर श्री वढू बुद्रुक येथील श्री शंभूमहाराजांच्या समाधीचे पूजन उपस्थित शिवभक्तांसोबत करण्यात आले. यावेळी श्री कृष्णाजी पाटील गुरुजी यांनी उपस्थित शिवभक्तांना तसेच ग्रामस्थांना शिवचरित्र या विषयावर तसेच छत्रपती श्री संभाजीमहाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती दिली.