तपशील

जून २०२५ :- शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व अन्नदान करण्यात आले, तसेच त्यांना शारीरिक व्याधींवर उपचार व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी वारकऱ्यांसाठी फलटण, जि. सातारा येथे अल्पोपहार व अन्नदान करण्यात आले, तसेच त्यांना शारीरिक व्याधींवर उपचार व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामध्ये पंढरीच्या भेटीसाठी शेकडो मैलांवरून चालत आलेल्या वारकऱ्यांना शारीरिक त्रासातून थोडाफार का होईना आराम मिळावा या उद्देशाने वारकऱ्यांच्या पाठ दुखी, गुडघे दुखी, खांदे दुखी, कंबर दुखी, मणक्याचे दुखणे अशा विविध व्याधींवर उपचार करण्यात आले. या आरोग्य सेवेसाठी ट्रस्टचे सदस्य श्री. संतोष भाबड आणि श्री. सचिन शिंगटे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी ट्रस्टच्या सदस्यांनी दिलेल्या या सेवेबद्दल वारीमध्ये सहभागी आपल्या माता-भगिनी व ज्येष्ठ वारकऱ्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या आषाढी वारी उपक्रमा दरम्यान सकाळच्या वेळी वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व चहा उपलब्ध करून देण्यात आला, याचा लाभ शेकडो हरीभक्तांनी घेतला. तसेच या वारीच्या प्रवासा दरम्यान वारकऱ्यांना त्यांचे मोबाईल चार्जिंग करता यावेत यासाठी संस्थेचे सदस्य श्री. संजय घाडगे यांच्या सहकार्याने १०० चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या माध्यमातून आपली सेवा श्री विठ्ठल चरणी अर्पण करण्याच्या अनुषंगाने ट्रस्टच्या सर्व हितचिंतकांच्या सहकार्याने वारकऱ्यांसाठी अन्नदान करण्यात आले. याचा लाभ वारीमध्ये सहभागी अनेक वारकऱ्यांनी घेतला. सोबतच वारकऱ्यांना वारीदरम्यान हरिनामाचा जप करण्यासाठी भजन-कीर्तनाची पुस्तके ट्रस्टच्या देणगीदारांच्या वतीने भेट म्हणून देण्यात आली. या अन्नदानाबद्दल हरिभक्तांनी ट्रस्टच्या सर्व हितचिंतक व देणगीदार यांचे विशेष आभार मानले. ट्रस्ट मार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरतेने निघालेल्या भक्तांना प्रवासादरम्यान उद्भवणारे सर्दी, ताप, खोकला, थकवा, अंगदुखी इत्यादी आजारांवर मोठ्या प्रमाणावर औषधे उपलब्ध करून देण्यात आली. सोबतच वारकऱ्यांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा यासाठी ट्रस्टमार्फत मोठ्या प्रमाणावर सुका खाऊ, फळे, पाणी इत्यादी वस्तू देखील पुरवण्यात आल्या. ट्रस्ट मार्फत राबविण्यात आलेला हा उपक्रम पार पाडण्यासाठी ह. भ. प. विजय महाराज बोबडे गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमावेळी शिवसंस्कृती ट्रस्टचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील सदस्य वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे वारकऱ्यांसाठी हे मदत कार्य राबविण्याकरिता महिला सदस्य तसेच लहान मुलांचे देखील मोठे सहकार्य लाभले. तरी त्यांच्या या सहकार्याबद्दल ट्रस्टमार्फत छत्रपती श्री शिवरायांची तेजोमय प्रतिमा देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमाच्या शेवटी उपस्थित ट्रस्टच्या सदस्यांसोबत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन उपक्रमाची सांगता करण्यात आली.