तपशील

जुलै २०२६ :- श्री ज्ञानेश्वर माऊली आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी ता. फलटण, जि.सातारा येथे अन्नदान, वैद्यकीय सुविधा, मालिश व अल्पोपहार असे उपक्रम राबविण्यात आले.

शिवसंस्कृती ट्रस्टमार्फत दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील श्री ज्ञानेश्वर माऊली आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी ता. फलटण, जि.सातारा येथे अन्नदान, वैद्यकीय सुविधा, मालिश व अल्पोपहार असे उपक्रम राबविण्यात आले. आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने ट्रस्टच्या वतीने विविध ठिकाणी अल्पोपहार वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. वारकऱ्यांना केळी, बिस्किटे, पिण्याचे शुद्ध पाणी, राजगिऱ्याचे लाडू तसेच इतर पौष्टिक खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. या सेवेमुळे वारकऱ्यांना प्रवासादरम्यान ऊर्जा मिळाली तसेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. वैद्यकीय उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील डॉ. सचिन भोईर (आयुर्वेदिक औषधी तज्ञ), डॉ. संतोष वारघडे (फिजिओथेरपिस्ट) यांच्यामार्फत विविध वेदनांनी त्रस्त असलेल्या वारकऱ्यांची आयुर्वेदिक औषधी तेलाने मालिश तसेच इतर वैद्यकीय उपचार करण्यात आले. या उपचारामुळे पाठ, कंबर, खांदे व अंगदुखीच्या त्रासात आराम मिळण्यास त्यांना मदत झाली. उपचारानंतर अनेक वारकऱ्यांनी वेदना कमी झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी वारकऱ्यांना वारीच्या पुढील प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या विविध शारीरिक व्याधी व त्रास कमी होण्यासाठी वैद्यकीय तज्ञांनी मार्गदर्शन देखील केले. वारीमध्ये शेकडो मैलांचा पायी प्रवास, बदलते हवामान आणि शारीरिक श्रम यांमुळे वारकऱ्यांना विविध आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागतो ही बाब लक्षात घेऊन शिवसंस्कृती ट्रस्टने वैद्यकीय सेवा केंद्र उभारून ट्रस्टमार्फत उपस्थित असलेल्या वैद्यकीय तज्ञांमार्फत वारकऱ्यांची तपासणी केली आणि गरजेनुसार सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, थकवा तसेच इतर विविध आजारांवर आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यानिमित्त ट्रस्टच्या वतीने सर्व देणगीदारांच्या सहकार्याने वारकऱ्यांसाठी अन्नदानाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे स्थानिक महिला आणि ट्रस्टच्या महिला सदस्यांनी या उपक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने व समर्पित भावनेने सहभाग नोंदविला. ट्रस्टमार्फत आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यामध्ये राबविण्यात आलेल्या अन्नदान व अल्पोपहार उपक्रमांसाठी ट्रस्टच्या हितचिंतकांनी वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर शिधा, फळे, बिस्किटे व पाणी बॉटल उपलब्ध करून देऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वस्तुरूपी हातभार लावला. शिवसंस्कृती ट्रस्टने समाजसेवेची परंपरा जपत ट्रस्टच्या सर्व देणगीदार व हितचिंतक यांच्या अनमोल सहकार्याने राबविलेल्या या उपक्रमाचे वारकरी तसेच स्थानिक नागरिकांनी मनापासून कौतुक केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यंदाची आषाढी वारी केवळ भक्तीमयच नव्हे, तर सेवाभाव आणि सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरले.